आर्त यमुनेच्या तिरी
राधिका येई न अजुनी
गोपिका जमल्या तरी
"का असा रुसवा गडे ?"
प्रश्न कृष्णाला पडे
साद व्याकुळ बासरीची
उंच जाई अंबरी ॥ धृ ॥
बासरीचे सूर भिरभिरती खुळे वाऱ्यासवे
राधिकेचा ठाव घेण्या त्यास करती आर्जवे
सांगती, "संदेश आतुर दे तिच्या जाउन घरी"
कृष्ण छेडे बासरी ॥ १ ॥
राग लटका दोन घटका, पण चिरंतर प्रीत आहे
भाबड्या ओठांत कृष्णाचाच जप अन् गीत आहे
वास कृष्णाचाच आहे राधिकेच्या अंतरी
कृष्ण छेडे बासरी ॥ २ ॥
- अनामिक
(२९/०४/२०१७, ०१/०५/२०१७)
(२९/०४/२०१७, ०१/०५/२०१७)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें