पुन्हा मी वाचले सारे तुझ्या डोळ्यात दडलेले
पुन्हा मी ऐकले गाणे तुझ्या ओठात अडलेले ॥ धृ ॥
मला बघताच हास्याची कळी हलकेच फुलणारी
जरा नजरानजर होता खळी गालात खुलणारी
पुन्हा टिपले मी चेहऱ्यावर गुलाबी रंग चढलेले
पुन्हा मी वाचले सारे.. ॥ १ ॥
भिडे या अंतरी जर सूर त्या हळुवार स्पंदांचा
कळे जर अर्थ मौनाचा, कशाला भार शब्दांचा ?
खुणावे पापण्यांना द्वार स्वप्नांचे उघडलेले
पुन्हा मी वाचले सारे.. ॥ २ ॥
- अनामिक
(०६/०१/२०१७ - ०७/०२/२०१७)