25 मई 2013

घाव (गझल)

किती निसटले खेळ हातुनी, अन विस्कटले डाव किती
मोजत बसता जुनाट जखमा, नवे चिघळती घाव किती

ससा हरे अन कासव जिंके, निदान शर्यत लढणारे
किती पळो कुंपणात सरडा, पल्याड त्याची धाव किती

ज्या बाजारी विकली जाती खोटी रंगित मोरपिसे
सत्याच्या चिमण्या पंखांना तिथे मिळावा भाव किती

खेळ रंगता डोंबा-याचा टाळ्या पिटती सर्व ’बघे’
पाय निसटतो, फुटते मस्तक, मदती येतो गाव किती

गरजेपोटी फुलती नाती, ओढ.. गोडवा.. आपुलकी..
गरज सरे, ’मेल्या’ वैद्याचे मुखात उरते नाव किती

- अनामिक
(२४-०५-२०१३)