23 मार्च 2005

हे असंच चालत राहील काय ?

तुझं स्वप्न बघण्यातच माझं जीवन संपून जाईल काय ?
प्रश्न सतवतो, शेवटपर्यंत हे असंच चालत राहील काय ? ॥ धॄ ॥

रोज सकाळी लवकर येतो
कॉलेजपाशी उभा राहतो
आता येशिल, नंतर येशिल
खुळ्यासारखा वाट पाहतो
उशीर होतोय, जाणवतं, पण जागीच खिळतात पाय ॥ १ ॥

कॉलेजमध्ये शिरल्यापासून
नजर सारखी भटकत असते
इथल्या वळणा-वळणावरती
तुझाच चेहरा शोधत बसते
तुला भेटण्याचा कुठलाही नाही सुचत उपाय ॥ २ ॥

कधी अचानक समोर आलीस
मी बोलायचा प्रयत्न करतो
तू तर लक्षही देतच नाहीस
माझा स्वर कंठातच विरतो
हळवे डोळे दाटून येतात, होतो मी असहाय ॥ ३ ॥

- अनामिक
(२३/०३/२००५)

14 फ़रवरी 2005

काय तुझ्या मनात

किती काळ माझ्या आशेचा झुलवशील झोका ?
काय तुझ्या लपलंय मनामधे, जरा सांगशिल का ? ॥ धॄ ॥

कधी दुरून मी दिसलो की नजरेस नजर मिळते
कधी मला बघता, बाजूला मान तुझी वळते
कटाक्ष तिरपा तुझा, चुकवतो हृदयाचा ठोका ॥ १ ॥

कधी मला पाहून तुझ्या गालात हास्य फुटते
मी हसताच तुझ्या ओठांची कळी घट्ट मिटते
तुझ्या अशा वर्तनामुळे होतो माझा विचका ॥ २ ॥

कधी दोन गप्पा माझ्याशी दिलखुलास करतेस
कधी शब्दही बोलत नाही, चक्क मौन धरतेस
उमजत नाही, तुला अचानक का येतो झटका ॥ ३ ॥

मैत्रिणींमधे कुजबुज होते मी आल्यावरती
खाणाखुणा - इशा-यांना त्यांच्या येते भरती
मीच निघुन जातो शरमेने, समजताच धोका ॥ ४ ॥

तुला वाटतो खेळच सारा, झुरतो मीच बिचारा
नाजुक माझे काळिज, त्यावर फिरवू नको निखारा
रहस्य हे उलगडून आता कर माझी सुटका ॥ ५ ॥

- अनामिक
(१४/०२/२००५)

31 जनवरी 2005

एक दिवशी

एक दिवशी अशी भेट अपुली घडावी
रास वाटेत फुलत्या कळ्यांची पडावी
आसमंतामधे गंध त्यांचा भरावा
धुंदल्या त्या क्षणी प्रीत अपुली जडावी

एक दिवशी सरी श्रावणाच्या पडाव्या
भावनांच्या रुपे काळजाला भिडाव्या
प्रेमवाटेवरी चिंब दोघे भिजावे
पाहुनी सोहळा हा विजा कडकडाव्या

एक दिवशी स्वरांनी तुझ्या संग गावे
प्रेमगीतात त्या रागही दंग व्हावे
इंद्रधनुषाकडे मागुनी रंग घ्यावे
स्वप्न डोळ्यांमधे मी तुझे रंगवावे

एक दिवशी तुझा हात हाती धरावा
स्पर्श हॄदयास नजरेतुनी तू करावा
एकमेकांत दोघे असे गुंग व्हावे
दोन जीवांमधे ना उरावा दुरावा

- अनामिक
(२९, ३०, ३१/०१/२००५)

23 जनवरी 2005

भिती

गंध तुझ्या हळव्या प्रेमाचा मनात माझ्या दरवळतो
भाव मनातिल तुला सांगण्या मात्र जरा मी अडखळतो
नित्य तुझा सहवास मिळावा, मनात अभिलाषा धरतो
का निष्कारण भिती वाटते, दडपणात मी वावरतो

तू दिसतेस मला जेव्हाही, क्षणात पुरता बावरतो
नजरेलाही नजर भिडवण्या खुळ्यापरी मी घाबरतो
काय म्हणू, अन्‌ काय नको, हा प्रश्न मस्तकी घुटमळतो
घाम कपाळावर फुटलेला गालावरती ओघळतो

बोलावेसे वाटे पुष्कळ, विषय एकही ना मिळतो
शब्द जिभेवर उमटतात, पण स्वर कंठातच विरघळतो
अजब भितीने थरथरणारे ओठ घट्ट मी आवळतो
फक्त जरा स्मितहास्य मुखावर दाखवतो, अन्‌ मी पळतो

ध्यानी येतो मूर्खपणा, अन्‌ नकळत मी मागे वळतो
उशीर झाला एव्हाना, हे जाणवता मी हळहळतो
पुन्हा एकदा पराभूत मी, जीव अंतरी तळमळतो
किती मनाला आवरतो, पण एक तरी अश्रू गळतो

- अनामिक
(१७, २१, २३/०१/२००५)

14 जनवरी 2005

फूल

रंगबिरंगी कळ्या-फुलांनी फुलली होती बाग
पानांतुन डोकावत होता गोंडस एक गुलाब

फूल गोजिरे मनात भरण्याइतके होते छान
किती पाहिले तरी शमेना नजरेतली तहान

भुरळ अशी पडली की नकळत तिथेच खिळले पाय
जीव जडावा असे न जाणे फुलात होते काय ?

कुरवाळीन जरा प्रेमाने, विचार सुचला असा
स्पर्श मखमली, गालावर, अन मनी उठावा ठसा

श्वासामध्ये भरून घेइन त्याचा मोहक सुवास
क्षणात केला खुळ्या मनाने स्वप्नायुगाचा प्रवास

"फूल तोडण्या सक्त मनाई", दाखविणा-या धाक
फलकावरल्या सूचनेकडे केली डोळेझाक

मोह अनावर इतका झाला, पुढे सरकला हात
फूल कोठले ? निराळेच लिहिले होते नशिबात

पानांमागे दडलेल्या काट्याने केला घात
खुपला बोटाला, पण झाली जखम खोल हृदयात

धुंदीतुन शुद्धीवर आलो, तिथे उमगली चूक
धार दिसत होती रक्ताची, फूल मात्र अंधूक

स्वप्ने रंगवल्याची शिक्षा, की नशिबाचा रोष
फुलास देऊ, काट्याला, की स्वतःस देऊ दोष ?

- अनामिक
(१४/०१/२००५)

(कविता तशी जुनी आहे. वैयक्तिक आवडत्या कवितांपैकी एक..)